Tuesday, May 5, 2020

कवी ग्रेस : इराणी संगीताच्या प्रतिमा



आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी
संगीताच्या प्रतिमा...

मला आलिंगनात मरण तसा रात्रीचा शृंगार,
तुझे चांदरातींचें अर्थनिळें मन....
कुठें याच्याही पलीकडे, कुठें त्याच्याही पलीकडे संपूर्ण
अवकाशाला टाळून फक्त वाऱ्यालाच ऐकूं येईल
अशी सारंगीची पिपासा
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा ....

वाळू पसरली देहापार, कुणाच्या नादांत?
कुणाच्या शोधांत?
स्वरसिद्ध तिचे अनंत कण; रेषाबद्ध उंटांच्या
मानेंत जसें चंद्रबन...
कुणी दिसत नाहीं; नाहीं दिसत एवढ्या प्रचंड
टापूंत मला, कुण्या युगांत येथे झाडें उगवलीं
असतील त्या डोळ्यांचा निरंगी नश्वर सुरमा,
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा...

मज्जेच्या खालीं तळमळणारे फुलांचे दैवी घोस...
कीं कुण्या वैदेहीची पंथविराम गुणगुण?
शिशिराच्या मागें वाजवी सूत्रधाराची धून...
नभ एवढें विराट, माझें नाहीं तसें तुझेंही नाहीं या
वाळूच्या सप्तरंगी कणांचें अज्ञातपण
फक्त दु:खाच्या देखाव्यांना दिशाबद्ध
करणारें पिरॅमिडांचे अधांतर  
                           ग्रेस- ( संध्याकाळच्या कविता पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९६७)
-----------------------------------------------------------------------------------------------------
       कवी ग्रेस यांची संध्याकाळच्या कविता मधील ही एक कविता. ती एखाद्या अमूर्त चित्रासारखी (abstract Paintings) आहे : अमूर्त चित्र डोळ्यासमोर दृश्य उभे करते, ते अस्पष्ट असते; त्यातील रंग रेषा, फटकारे आपल्याला मोहून घेतात, पण अर्थ कळत नाही; तो चित्रकाराचा हेतूही नसतो, तरी चित्रासमोरून आपण हलत नाही. कारण तर्क, अर्थ, अन्वय, वास्तव यांच्या पलीकडची स्पंदने त्यात उमटलेली असतात. त्यात अर्थ नसतो तर संवेदना असतात. असे चित्र रसिकाच्या संवेदनेलाच आवाहन करीत असते. या संवेदनांच्या गुंतवळ्यातूनच तर रसिकाला चित्रकाराचे मूडस जाणवतात. जाणिवेच्या पलीकडील नेणीवप्रधान अवस्थेत रसिक पोचतो, त्या अवस्थेचे वर्णन त्याला करता येत नाही पण ती अवस्था मात्र तो अनुभवतो. त्याचे मन त्या चित्रातील मूड्सप्रमाणे त्या त्या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असते.
ग्रेस यांची कविताही वाचकाला अशा मूड्समधेच नेते. अशा मूडसचा नेमका अर्थ न लागल्यामुळे तथाकथित वाचनसुलभ परंपरेने ग्रेसला दुर्बोध कवी ठरवले आणि तरीही त्या कवितांचा अर्थ शोधण्याची धडपडही केली.
            ग्रेस यांची कविता कोडे नाही. ग्रेस यांची कविता उखाणा नाही. त्यामुळे तिची सोडवणूक करणे उलगडा करणे, अर्थ सांगत बसणे या क्रियादेखील तितक्याच दुर्बोध किंवा निरर्थक ठरतात. आता एखादा सांगतोच म्हणतो अर्थ तर आपण कशाला बोला? कारण अमूर्त चित्र पाहून त्यात नदी दिसते, घोडा आहे वगैरे सांगणारे असतातच की! पण हे लक्षात घ्या, चित्रात जे दिसते त्याचा अर्थ किंवा संबंध चित्रकाराला तोच अभिप्रेत आहे असे नसते. निर्मितीच्या क्षणी त्या कलावंताला आपल्या भावना आणि संवेदनांना ज्यातून आणि जशा व्यक्त कराव्याशा वाटतात, तसतसे रंग, आकार, फटकारे, कुंचल्यावरचा दाब, ताण, स्ट्रोक तो साकारतो. ते काढून झाल्यावरही त्याची तीच भावना असत नाही, किंवा पुन्हा तेच चित्र  पाहताना तीच प्रक्रिया घडत नाही. ही कलावंताची मर्यादा नव्हे तर तो मानवी मनाचा स्वभाव आहे.  
ग्रेस या मानवी स्वभावासह, या मानसिक प्रकियेसह आणि कलावंताच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वासह त्यांच्या कवितेत प्रकटतात. ते वास्तवसंबोधन असणाऱ्या पण त्यांच्या नेणिवेला साकारणाऱ्या प्रतिमा वापरतात, त्यामुळे त्यात संबोध  वास्तविक असला तरी अर्थ कविगत असतो. म्हणजे कवीने घोडा, नदी, चांदणे, कावळा उर्मिला वगैरे शब्द वापरले जे वास्तव आहेत, त्यांचा निर्देश सांस्कृतिक आहे, तरी त्याचा हा परिचित अर्थ ग्रेसला अभिप्रेत नसतो. ते त्याला अ-सांस्कृतिक आणि काव्यगत करतात. थोडक्यात आपल्या सोयींचा अर्थ घेतात. अमूर्त चित्रात हिरवा रंग निसर्गाचा, निळा आकाशाचा असे नसते, रंगांचे हे प्रचलित अर्थसंकेत चित्रकार बदलून त्याला स्व:सापेक्ष संदर्भाचे अर्थ प्रदान करतो. हे इतर कलेत योग्य, पण साहित्य या अर्थप्रधान कलेत कितपत योग्य? हा भाग अलहिदा. पण ग्रेस साहित्यकलेला अर्थप्रधान नाही तर संवेदनाप्रधान कला मानतात हे लक्षात घ्या. त्यामुळेच त्यांचे काव्य वाचल्यावर ग्रेसशी थेट संवाद होत नाही. संवादाच्या (Communication) परिचित प्रक्रियेला ग्रेस तडा देतात. म्हणजे ग्रेसची कविता हा कवीचा आत्मसंवाद असतो. वाचकाचा कवितेशी संवाद होतो, कवीसोबत नाही.
भारतीय साहित्यशास्त्र कवी-कविता-रसिक अशी तीनपदरी संवादप्रक्रिया मानते, मर्ढेकर कवी-कविता आणि कविता- रसिक असा दुपदरी संवाद मानतात. ही मर्ढेकरी प्रक्रियाच ग्रेस यांना मान्य आहे. म्हणून ते कवितेतून वाचकांशी संवाद साधत नाही तर कवितेशीच संवाद साधतात. हे सूत्र लक्षात घेऊन त्यांच्या कवितेकडे जायला हवे. म्हणजे त्यांची कविता पूर्वसूरींहून वेगळी, अपारंपरिक, वाचकसुलभता टाळणारी आणि कवितेपेक्षा चित्राच्या पदवीला जाऊन पोचणारी कशी आहे ते कळते.
ग्रेस कवितेला साहित्यकलेपेक्षा वरचा दर्जा देऊ पाहतात. म्हणजे काव्य अर्थापेक्षा संवेदनेच्या पातळीवर प्रकट व्हावे, जे संगीत, चित्र, नृत्य, शिल्प या कलांमध्ये घडते, अशी त्यांची भूमिका आहे. या कला अर्थापेक्षा संवेदनावर आधारलेल्या आहेत. रसिक आस्वाद घेताना अर्थापेक्षा श्रुती आणि दृश्य या संवेदनेच्या पातळीवर पोचतो. कवीही अर्थापेक्षा संवेदना प्रकटीसाठीच धडपडतो. ग्रेस यांच्या कवितेत हेच घडते. ग्रेस यांनी इतरत्र म्हटले आहे:
भाषाच ही निकामी शब्दास ही पुरेना
संवेदनाच द्यावी अर्थास काय पुन्हा ?
याचा अर्थ काय? एक, ग्रेस साहित्यकलेला निव्वळ सौंदर्यकला म्हणजे ललित कला म्हणून पाहतात. दोन, त्यांची ही भूमिका जीवनवादी नाही, कलावादी आहे. केवळ संवेदनांवर आधारलेला अनुभव अर्थ निरपेक्ष असला तरी तो विशुद्ध सौंदर्यानुभव असतो, असा विशुद्ध अनुभव भावना आणि संवेदना यांच्या लयतत्त्वाने इतर कलांप्रमाणेच साहित्यात प्रकटावा ही मर्ढेकरांची भूमिका कवी ग्रेस यांनी आत्मसात पूर्णपणे केली आहे. मर्ढेकरी सौंदर्यशास्त्राचे मराठी कवितेत कुणाला प्रात्यक्षिक पहावयाचे असेल तर ते ग्रेस यांच्याच कवितेत. तर अशा अर्थनिरपेक्ष कवितेचा अर्थ शोधू पाहणाऱ्यांनी तिला दुर्बोधतेच्या गर्तेत ढकलले तर नवल काय?
एवढी पार्श्वभूमी घेऊन ग्रेसच्या इराणी संगीताच्या प्रतिमा या कवितेकडे जाऊ.
दृक-श्राव्य संवेदनांची गुंफण
या कवितेचा आता अर्थ सांगणे नाही, तर तिच्या आस्वादातून काय जाणवले? कोणते मूड्स, जाणवले ते सांगणेच हाती आहे. अमूर्त चित्रात काय रंगविले हे सांगायचे नसते, काय जाणवते तो आत्मप्रत्ययच व्यक्त करायचा असतो. ग्रेस यांच्या इतर कवितेप्रमाणेच ही कविताही गूढ धुकेच वाटू शकते. आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी संगीताच्या प्रतिमा या ओळीनेच आपण कवितेकडे ओढले जातो. इराणी संगीत, मग वाळू, मग त्यावरच्या प्रतिमा, त्याही आपोआप हलताहेत असे कवी म्हणतो, तेव्हा आपण अधिक बुचकळ्यात पडतो..
 एक लक्षात घ्या, आपल्या डोळ्यांसमोर दृश्य उभे राहत असले तरी, ग्रेस येथे दृश्य सांगत नाहीत तर दृश्याबद्दलची भावस्थिती सांगत आहेत. या भावस्थितीमुळे थोडे दृश्य संवेदनेचे तुकडे आपल्या हाती लागतात, त्यासाठी कवीने ज्या शब्दांवर स्ट्रोक- भर दिला आहे, ते पाहू- वाळू, रेषाबद्ध उंटांच्या माना, एवढ्या प्रचंड टापूंत, नभ एवढे विराट, पिरॅमिडांचे अधांतर.. यांतून आपल्या समोर वाळवंटाची दृश्य संवेदना जागी होते. विराट पसरलेले वाळवंट, त्यावर उंटाचे रेषाबद्ध मान हलवत जाणे, त्यांच्या सावल्यांच्या प्रतिमा वाळूवर उमटणे आणि त्यांच्या चालण्यामुळे त्या आपोआप हलत आहेत असे कवीला जाणवणे असे या भावस्थितीचे स्वरूप आहे.
पण कवी केवळ दृश्य संवेदनेवर थांबत नाही, त्याच्या जोडीला इराणी संगीत म्हणजे श्रुती संवेदनाही आहे. आता या संवेदनेचे कवितेत विखुरलेले तुकडे पाहू: इराणी संगीत, फक्त वाऱ्यालाच ऐकूं येईल अशी सारंगीची पिपासा, वैदेहीची पंथविराम गुणगुण, शिशिराच्या मागें वाजवी सूत्रधाराची धून .. इकडे लक्ष दिले की ग्रेस दृश्य संवेदनेत श्रुती संवेदनेचे मिश्रण कसे बेमालूम पण नकळत करतात ते लक्षात येते. वाचकाला ते या मिश्र संवेदनांत कसे बुडवून टाकतात आणि शब्दांच्या माध्यमातून ते वाचकाचा कब्जा घेऊन त्याच्यावर गारुड कसे करतात, ते स्पष्ट होते.
भावना विविधतेचे मिश्रण
      केवळ संवेदनाच नव्हे, भावनाही ग्रेस व्यक्त करीत जातात. या कवितेत, निराशा, उदासी, एकटेपणा, हताशपणा, प्रेम, प्रणय, कामगंड, भक्ती, मानवी जीवन आणि अस्तित्त्वाची अतर्क्यता, त्यामुळे निर्माण झालेली साशंकता, शृंगाराची आसक्ती आणि मृत्यूचे भय अशा विविध भावना एकत्र दाटून आल्या आहेत.
     या भावना कशा प्रत्ययास येतात पाहा: मला आलिंगनात मरण तसा रात्रीचा शृंगार या ओळीतून शृंगाराची आसक्ती, कामगंड आणि मृत्यूचे भय दिसून येते. वाळू पसरली देहापार, कुणाच्या नादांत? कुणाच्या शोधांत? यातून मानवी अस्तित्व आणि देह यांचा घेतलेला तीव्र वेध, मानवी जीवन आणि अस्तित्त्वाची अतर्क्यता यांचा शोध दिसतो. या शोधातच कवीला जाणवते की, कुणी दिसत नाहीं; नाहीं दिसत एवढ्या प्रचंड टापूंत मला.. या अनुभवातून एकाकीपणा आणि त्यातून प्राप्त होणारे दु:ख, निराशा, उदासी, एकटेपणा, हताशपणा यांनी कवीचे मन व्यापून जाते.
या अवस्थेतच कवीला मग सृष्टी, विश्व, अस्तित्व निर्मितीचा प्रश्न छळत जातो. कुण्या युगांत येथे झाडें उगवलीं असतील असे तो विचारत जातो. हे एवढे विराट विश्व पण त्यावरही मानवी सत्ता नाही असा नियतीवादही ते कसे सांगतात पाहा: नभ एवढें विराट, माझें नाहीं तसें तुझेंही नाहीं. या ओळीतून अस्तित्त्वाच्या कोणत्याच गोष्टींवर मानवाची सत्ता नाही याची खंत कवी व्यक्त करतो आहे हे दिसते. वाळूच्या सप्तरंगी कणांचें अज्ञातपण | फक्त दु:खाच्या देखाव्यांना दिशाबद्ध | करणारें पिरॅमिडांचे अधांतर या ओळीतून विश्वाची अफाटता, पण वाळूच्या कणांसारखी क्षुद्रता, त्याचे अनाकलनीय आणि दु:खद स्वरूप, आणि शेवटी प्राप्त होते ते मृत्यूचे पिरॅमिडरूपी थडगे, ही अर्थच्छटा जाणावते. अशाप्रकारे, मानवी जीवन, अस्तित्त्व आणि मानवी संस्कृती, व्यवस्था यांची निरर्थकता, अतर्क्यता आणि त्यातून आलेली साशंकता, दुबळेपणा कवी  व्यक्त  करत जातो.
 या प्रवाहातच कवीला सृष्टी, तिचे ऋतुचक्र आणि अशा सुंदर निर्मितीचा विलय करणाऱ्या अज्ञात शक्तीबद्दल प्रश्न पडतो. कवी म्हणतो: आणि या शिशिराच्या मागें वाजवी सूत्रधाराची धून...या ओळीतून विश्वाच्या निर्मितीच्या मागे असलेले तत्त्व आणि त्याची अनाकलनीयता, त्याच्या विषयीचे पडलेले प्रश्न कवी व्यक्त करत जातो. मज्जेच्या खालीं तळमळणारे फुलांचे दैवी घोस...इथे जीव निर्मितीच्या मुळाशी असलेली लपलेली तीव्र कामभावना याचा कवी वेध घेतो, मात्र या जीव व सृष्टीनिर्मितीच्या मागेच विनाशाची पावले आहे हे जाणवून कवी अधिक खिन्न होतो.
व्यष्टी आणि समष्टीची निर्मिती, त्यांचे अस्तित्व आणि विनाश यांबद्दलची भयभावना या कवितेत आहे. आपल्या दु:खाशी विश्वाचे दु:ख जोडून घेण्याचे संतांसारखे कारुण्यही या कवीजवळ आहे. मात्र संत सामान्यांना या आर्त आकांतातून मुक्त करतात, ते अपार्थिवाकडे नेतात, ग्रेस वाचकाला आकांतात बुडवून टाकतात, ते आपल्याला पार्थिवाकडेच नेतात.
 मला आलिंगनात मरण तसा रात्रीचा शृंगार | तुझे चांदरातींचें अर्थनिळें मन...| कुठें याच्याही पलीकडे, कुठें त्याच्याही पलीकडे संपूर्ण | अवकाशाला टाळून फक्त वाऱ्यालाच ऐकूं येईल | अशी सारंगीची पिपासा.. इथे कामपूर्तीच्या तीव्र प्रणयप्रसंगीच मनाच्या तळातून (मज्जेच्या) उगवून आलेली निरर्थकतेची, मृत्यूची, भयाची जाणीव भावना कवी व्यक्त करत जातो.
 इथे कवीने संवेदना आणि भावना यांची लयबद्ध गुंफण केली आहे. शिवाय जीवन चिंतनही आहे. म्हणून हा अनुभव नुसता रोमँटिक किंवा फॅशनेबल नाही. विचार, संवेदना आणि भावना यांची संबंधांच्या संबंधांमध्ये तर्क विरहित लय स्थापन केला की सौंदर्य निर्माण होते, या मर्ढेकरी सौंदर्यविचारांचे हे उत्तम प्रात्यक्षिक आहे.
            जीवन चिंतनाची डूब
      ग्रेसच्या कवितेत, मानवी जीवन, अस्तित्त्व, त्यांचा सनातन प्रवाह, त्यात मानवाचे क्षूद्र स्थान, हाती काहीच नाही ही अगतिकता, कवीचे अंतर्भूत मन, अंतर्मन, समूहमन, आदिममन यांसह असलेले समग्र व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय संगीत, चित्र, शिल्पादी कलांचा अनुभवही आहे; आणि या सर्व चिंतनाला पार्श्वभूमीसारखे व्यापून असलेले संगीतही आहे. हे ग्रेसने ठरवून मुद्दाम केले नाही, तर त्यांच्या निर्मितिप्रक्रियेचे स्वरूपच तसे आहे. त्यांच्या कवितेचा शोध निर्मितिप्रक्रियेच्या आकलनातूनही घेता येईल. त्यांची निर्मितिप्रक्रियाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकीच गुंतागुंतीची आहे हे खरे. कसे आहे हे कवीचे व्यक्तिमत्व?
            अव्वल प्रतिभा आणि काव्यभाषाभान असलेला कवी   
      कवी ग्रेस हे एक लहरी अवलिया व्यक्तिमत्त्व होते हे साऱ्यांना माहित आहे, पण त्याचवेळी ते  कलासक्त व्यक्ती होते हे ठाऊक आहे ना? ग्रेस नागपूरला मॉरीस कॉलेजात मराठी शिकवीत आणि नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राचीन काव्य आणि ललित कला विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून सौंदर्यशास्त्र शिकवीत. मी दोन्ही ठिकाणी विद्यार्थी होतो आणि त्यांच्या या रसाळ, भारवाही, मंत्रमुग्ध अध्यापनाचा अनुभवही घेतला आहे. ज्ञानदेव, जनाबाई, तुकारामादी कवीपासून पंडित आणि कालिदासादी संस्कृत कवींची अवतरणे त्यांना पाठ होती. भारतीय आणि पाश्च्यात्त्य सौंदर्यशास्त्र त्यांनी अभ्यासले होते. संगीत, नृत्य, नाटक, शिल्प, चित्र, चित्रपट या कलांची त्यांची अभिरुची अभिजात होतीच. शिवाय प्रवाही ओघवती भाषा आणि साहित्याचे माध्यम म्हणून तिचे स्वरूप यांची त्यांना उत्तम समज होती. यातून अत्यंत बुद्धिमान, अव्वल प्रतिभावंत आणि भावनोत्कट अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय होतो. शिवाय ते मनोव्याधीग्रस्त असून आणि आत्ममग्न आणि एकांतात जगत हेही आपल्याला ऐकून माहीत आहे.
             ग्रेस यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या निर्मितीत त्यांचे हे व्यामिश्र आणि गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व समग्रपणे प्रकटते. निर्मिती जर समग्र व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार असेल तर त्या निर्मितीत कवी त्याच्या गुणदोष, वृत्ती, प्रवृत्ती मन, अंतर्मन आणि आदिममनासह प्रकटणे गरजेचे आहे. तेच ग्रेस यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांची कविता इतकी विदग्ध होते. हे सारे उस्फूर्तपणे घडते. उत्कट आत्माविष्काराची आतुरता हा श्रेष्ठ वाङ्मयीन गुण ग्रेस यांच्यात आहे.
            ग्रेस यांच्या कवितेच्या आस्वादासाठी त्यांची चरित्रात्मक समीक्षा पूरक ठरते. मात्र केवळ तोच आधार घेतला तर मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र, साहित्यशास्त्र, अस्तित्ववाद, आदिबंधात्मक अशा विविध दृष्टीकोन तिच्या आकलनासाठी सोबतीला घ्यावे लागतात.
            इराणी संगीताच्या...या स्पष्टीकरणाला पूरक ठरते ती ग्रेस यांची साहित्यकलेच्या भाषा या माध्यमाबद्दलची भूमिका. ती कळली की त्यांच्या दुर्बोधतेचे निरसन होते. ग्रेस म्हणतात, “जी भाषा आपण वापरतो ती सांस्कृतिक व सामाजिक अर्थाने पूर्ण वाकलेली आहे, तेव्हा सामाजिक अर्थाचे व सांस्कृतिक अर्थाचे बांडगुळ तिच्यावरून दूर सारले पाहिजे. म्हणजे सृजनात्मक कल्पनाशक्तीने तिला सतत तासत गेले पाहिजे. इतके की तिची आणि संवेदनेची भाषा एकच होईल. या क्रियेत नको असलेल्या भाषेचा जो जो स्तर आडवा येईल. त्यालाही तासले पाहिजे. अगदी या क्रियेच्या संपृक्तबिंदूपर्यंत हे जर झाले तरच शब्दांचा पद्मबंध हा शब्दांमध्येच स्वरांचा पद्मबंध निर्माण करू शकतो” [1]
            याचा अर्थच ग्रेस यांना कवितेची भाषा सामाजिक-सांस्कृतिक अर्थनिरपेक्ष करावयाची आहे आणि तिला विशुद्ध संवेदनेच्या म्हणजे संगीताच्या पातळीवर न्यायची आहे. ही भूमिका, मर्ढेकरांच्या अनेक संवेदनांची साहित्यकला भ्रष्ट आणि एका संवेदनेची (श्रुती) संगीतकला श्रेष्ठ या भूमिकेवर आधारलेली आहे.
            मात्र मिलिंद मालशे आणि अशोक जोशी, या लेखकद्वयांच्या मते, ग्रेस यांची ही भूमिका प्राग प्रणाली आणि सुझान लँगर यांच्या जवळ जाणारी आहे. लँगरच्या मते, “कलात्मक प्रतीके ही कोणत्याही प्रत्यक्ष अस्तित्त्वात असणाऱ्या वस्तूंचा निर्देश करत नाहीत, तर संवेदनांच्या आणि भावनांच्या घडणीचा प्रत्यक्ष अनुभव ही प्रतीके देतात” [2] कवी ग्रेस यांची काव्यभाषेबद्दलची ही भूमिका लक्षात घेतली की तिच्यावरच्या दुर्बोधतेचा शिक्का पुसता येतो. त्यांच्या कवितेतील प्रतीकांचे स्वरूप अ-सांस्कृतिक आहे हे लक्षात येते. ग्रेस यांच्या कवितेतील संगीत आणि काव्यानुभवाचे नाते स्पष्ट करता येते. महत्त्वाचे म्हणजे इराणी संगीताच्या प्रतिमा.. चे अधिक आकलन होण्यास पूरक ठरते.
      ग्रेस यांची भाषाविषयक भूमिका आणि त्यांच्या कवितेचे स्वरूप हा पुन्हा स्वतंत्र विषय आहे.
 



१. आधुनिक समीक्षा सिद्धांत, मिलिंद मालशे आणि अशोक जोशी, मौज प्रकाशन, मुंबई, २०००७, पृ. १० 
२. तत्रैव, पृ. ११

पूर्वप्रसिद्धी : 
१.  सर्वधारा, अमरावती, जुलै-ऑग-सप्टें, २०१३ 
२. कवितेचा अंत:स्वर, पद्मगंधा प्रकाशन, पुणे,  २०१८ 
(सदर लेख 'ग्रेस : वेदना आणि सौंदर्य'  संपा. अजय देशपांडे , विजय प्रकाशन, नागपूर, २०१५ ग्रंथात समाविष्ट )

ग्रेसची प्रेमकविता : पापसंकल्पनेकडून सौंदर्यशिल्पाकडे


          

दुपार- स्त्रीदेहाचे चिंतन. रात्र- स्त्रीदेहाशी संमीलन. स्त्रीदेहाच्या चिंतनाचा दिवस आणि संमीलनाची रात्र यांच्या अनुभूतीचा संधिकाल म्हणजे संध्याकाळ. संध्याकाळ हे ईश्वरी युनिट.’..माझ्या आईची प्रतिमा..जशी स्त्री या संकल्पनेची प्रतिनिधी आहे. त्याचप्रमाणे ती ‘स्त्री’तून निर्माण होणाऱ्या सर्व नात्यांचीही प्रतिनिधी आहे. माझी प्रेमकविता ही संपूर्णपणे असांकेतिक असण्याचे हे कारण आहे. माझी आई माझी प्रेयसी. माझी आई- माझ्या वासनांचे स्मृतिरूप जागरण. माझी आई- स्त्री देहाच्या शक्तीचे अंतिम भयाण केंद्र. माझी आई माझे क्रौर्य माझी आई- माझी करुणा. म्हणून..स्त्रीला विभिन्न पातळ्यांवर समजून घेणे हाच मला पुरुषार्थ वाटतो. --- ग्रेस     
                                                                (डॉ. अक्षयकुमार काळे यांना दिलेल्या मुलाखतीतून)  दिवस
--------------------------------------------------------------------------------------------------------------
              ‘संध्याकाळच्या कविता’ या संग्रहात ग्रेसच्या अनेक प्रेमकविता आहेत. अर्थातच त्या पारंपरिक प्रेमकवितांपेक्षा भिन्न आहेत, हे सांगायला नकोच. त्यांची एकेक कविता एकेका विषयाला वाहिलेली नाही, ती विषयांची नव्हे तर जाणिवांची कविता आहे. हा साठोत्तरी मराठी कवितेचा विशेष आहे. आरती प्रभू, चित्रे-कोलटकर यांच्या कवितेत हे आपल्याला प्रामुख्याने दिसते. पण ग्रेसच्या सर्वच कवितांचे ते वैशिष्ट्य आहे.
              ग्रेस यांच्या कवितेत एकाच वेळी प्रेम व भय, आसक्ती व द्वेष अशा परस्पर विरुद्ध भावनाही दिसून येतात. त्यांची अनुभूती व्यामिश्र, आणि  वृत्ती, संवेदना व जाणिवांना प्राधान्य देणारी आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण कवितांमधून निव्वळ प्रेमकविता म्हणून काही वेगळे काढणे शक्य नाहीच; तर त्यांच्या प्रेम जाणिवेबद्दल बोलावे लागते. मात्र ही प्रेमजाणीव टाळून त्यांच्या कवितेचा विचार करणे शक्य होणार नाही. याचे कारण संध्याकाळच्या कवितांचे ते एक महत्त्वाचे सूत्र आहे.
              शिरीष पै यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘संध्याकाळच्या धूसर वातावरणात ग्रेसचे दु:ख फिरून फिरून जन्म घेते. संध्याकाळीच ही वेदना पुन:पुन्हा जागी होते, कारण याचवेळी आत्मा एकटा होतो- तो स्वतःतून वाहणाऱ्या प्रवाहाच्या उगमापर्यंत जाऊ शकतो.”  (मलपृष्ठ: संध्याकाळच्या कविता)
              पण ग्रेस यांच्यासाठी ही संध्याकाळची वेळ दु:ख आणि वेदना यांना जन्म देणारी असली तरी ती आत्मिक प्रवाहाची म्हणून नव्हे, तर स्त्री आसक्तीची वेळ म्हणून महत्त्वाची आहे. कारण जिला आपण मावळतीची सांज म्हणतो, संस्कृतीच्या दृष्टीने जी गोरज- गायी घराकडे परतताना त्यांच्या पायांची धूळ उडवणारी- वेळ आहे. तिला साहित्यातही वेगवेगळ्या नावांनी संबोधले आहे: आरती प्रभू ‘दिवेलागणीची’ वेळ मानतात. अरविंद गोखल्यांना ती कन्फेशनची- आत्मस्वीकृतीची ‘कातरवेळ’ वाटते. नियतिवादी जीएंच्या दृष्टीने ती ‘बाधा’ होणारी वेळ आहे...पण ग्रेस मात्र तिला स्त्रीदेहाच्या चिंतनाचा दिवस आणि संमीलनाची रात्र यांच्या अनुभूतीचा संधिकाल मानतात.
              म्हणजे स्त्री आसक्ती आणि स्त्रीमीलन यांच्या दरम्यानची अवस्था अनुभवास देणारी ही वेळ. इथे ग्रेस दिवस-संध्याकाळ-रात्र = स्त्री देहाची आसक्ती-हुरहूर-मीलन असा आदिबंध मानतात. (त्यांच्या कवितेत असे अनेक आदिबंध आहेत, ते शोधणे हा स्वतंत्र विषय ठरेल) ग्रेसांच्या कवितेत निसर्गाचे ऋतू आणि दिवसाच्या अवस्था आणि मानवी जीवनातील घटना, भावना, संवेदना यांचा आदिबंध दिसतो. म्हणून संध्याकाळची वेळ (ऋतूची अवस्था)  स्त्रीची ओढ आणि हुरहूर, (शारीर), विफलतेचे दुख (भावना) -असा ऋतू-शरीर-भावना आदिबंध या कवितांमध्ये आहे.
              याचा अर्थ दिवसभराच्या आसक्तीनंतर रात्रीच्या मीलनाची ही असोशीच कवीसाठी वेदना व तेच दु:ख! तेच फिरून फिरून कवितेतून प्रकटत राहते. म्हणून कवीला आपण दु:खाचा महाकवी आहे असे वाटते. पण ती प्रकटते तेव्हा वेदनेचे फुलात रूपांतर करते.
              ग्रेस यांच्या कवितांच्या केंद्रस्थानी हीच स्त्रीजाणीव, प्रेमजाणीव आहे हे लक्षात घ्यावे लागते. इतर जाणिवा तिच्याशी संवादी, जोडून, साहचर्याने व दुसऱ्या स्थानी आहेत. ग्रेस यांच्या कवितेच्या या केंद्राचा विचार होणे फार गरजेचे आहे. पण त्याचे स्वरूप जाणून घेण्याआधी ग्रेसचे व्यक्तिमत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे.
कवी ग्रेस : व्यक्तिमत्त्वाची अनन्यता
              कवितेचे विश्व आणि कवीचे भावविश्व अशी दोन वर्तुळे कवितेच्या प्रांतात असतात. विशेषत: भावकवींच्या बाबतीत हे घडत असते. ग्रेससारख्या भावकवींच्या कविताविश्वात संवेदना व  भावना यांना तर; भावविश्वात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला महत्त्व असते. व्यक्तिमत्त्व ही गोष्ट खूप गुंतागुंतीची असते. बाह्य आणि आंतरिक असे दोन पदर त्याला असतात. ग्रेस यांचे बाह्य  व्यक्तिमत्त्व कलासक्त, कलासंपन्न आहे. म्हणून चित्रपट, चित्रकला, संगीत, शिल्प, नाट्य, नृत्य आदी कला, अध्यात्म, महानुभाव, संतकवी, शाक्तपंथ ते जे कृष्णमूर्तीं..असे तत्त्वज्ञान- हे सारे या बाह्य व्यक्तिमत्वाला व्यापून आहे.
              पण ग्रेस यांचे आंतरिक व्यक्तिमत्वही तितकेच, किंबहुना याहून जास्त व्यामिश्र आहे. कारण त्यांच्या निर्मितिप्रक्रियेत त्याचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे. ग्रेसच्या निर्मितीत हे व्यासंगी, कलासक्त, व्यामिश्र असे बाह्य व्यक्तिमत्त्व तर प्रकटतेच, त्यांचे आंतरिक व्यक्तिमत्वही  प्रकटते. पण ही प्रक्रिया एवढ्यावर थांबत नाही. एक तिसरे व्यक्तिमत्वही त्याचवेळी कार्यरत असते, जे त्यांच्या आदिम मनाशी संबंधित असते. ही थेअरी सिग्मंड फ्राॅइडचा शिष्य कार्ल युंगने मांडली आहे. त्याने मन आणि अंतर्मन यांच्या जोडीला तिसरे मन म्हणजे आदिम मन मानले आहे. त्यालाच समूहमन किंवा Collective Unconscious  असे म्हणतात.
              मन हे जीवनानुभव आणि शिक्षणाने निर्धारित होते, अंतर्मन त्याच्या मनाने दडपून दाबून टाकलेल्या भावना –विकारांनी युक्त असते. थोडक्यात हे दोन्ही व्यक्तिगत असतात. परंतु आदिम मन हे शेकडो वर्षांच्या समूहाच्या जाणिवांनी बनते. ते व्यक्तिगत नसते. सामूहिक असते. अस्सल कलावंत अशा संपूर्ण व्यक्तिमत्वासह कलाकृतीत प्रकटत असतो. साहित्यात, आत्मनिष्ठ वाङमय प्रकारात हे घडते. भावकवीच्या बाबतीत हे विशेषत्वाने घडते. जे कवी स्वत:च्या निर्मितिप्रक्रियेपेक्षा वाचकवर्गाची जाणीव गृहीत धरून लिहितात, तेव्हा हे आदिम मन प्रकटत नाही. म्हणून मराठीतील अनेक भावकवींच्या कवितेबाबत हे घडून येत नाही. उदा. गझलकार. ग्रेस हे अव्वल दर्जाचे प्रतिभावंत, अनुभवाशी व निर्मितीशी इतके प्रामाणिक असतात की दुर्बोधतेचा दोष पत्करून ते मनाच्या सर्व अवस्थेसह कवितेत प्रकटतात. वाचकसापेक्षता बाजूला ठेवतात. अनुभवाशी इमान राखतात.
              ग्रेसचे व्यक्तिमत्व असे तिहेरी असले तरी त्यांचे अंतर्मन आणि आदिम मनच त्यांच्या कवितेत प्राधान्याने प्रकटते. त्यामुळे  समूर्त अनुभवापासून कविता सुरू झाली तरी ती अंतर्मनाच्या प्रवाहात वाहत जाते. मात्र या प्रवासात त्यांना लाभलेली दैवी देणगी म्हणजे प्रतिमांकित भाषा त्यांच्या कायम सोबत असते. त्यामुळे कार्यकारणभाव, तर्क, अंदाज यांच्या पलीकडे ती जाते. ती कोणत्याही पूर्वपरंपरेशी नाते सांगत नाही किंवा कुणाचा प्रभाव स्वीकारत नाही. ती स्वयंभू आणि स्वतंत्र आहे.
              ग्रेस यांच्या प्रेमकवितेकडे वळण्याआधी या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात.
ग्रेसची प्रेमकविता : परंपरा आणि नवता
              ग्रेसची पारंपरिक पद्धतीची प्रेमकविता नाही. तिच्यातील प्रेमभावनेचे, शृंगार आणि कामभावनेचे स्वरूपही पारंपरिक नाही. याचे कारण ग्रेस या कवीचा स्त्रीविषयक दृष्टीकोन. ते स्त्रीकडे कोणत्या दृष्टीने पाहतात? संध्याकाळच्या कवितांमधील उर्मिलेच्या कविता पाहा:
              या हातानें स्तन गोंदवून घे लाव मंदिरी दिवा
              फुल होऊनी अंधाराचे गळुन पडे काजवा
              लाव मंदिरी दिवा परंतु सोड स्तनांची माया
              मरणावाचून आज सजविली मीच अपुली काया
              ग्रेसच्या कवितेत असा स्त्रीरुपाचा वेध दिसतो. आपल्या वेदनांवर प्रेयसीने फुंकर मारावी अशी कवीची अपेक्षा असते. स्त्रीचे शरीर आणि तिचे अवयव यांचेही उल्लेख कवितेत येतात, पण ते स्त्री-भोगाच्या पातळीवरचे नसतात. डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या मते, “स्त्रीचा आदिम स्वरूपातील कामभाव, समर्पणशीलता, प्रेमव्याकुळता, कारुण्य आणि पिपासा अशा अनेक वैशिष्ट्यांना ग्रेसची कविता साकार करते. ही स्त्री भारतीय स्त्रीजीवनाचे प्रतीक म्हणून समोर येते.” (ग्रेसविषयी,विजय प्रकाशन,२००९,पृ.१०३) त्यामुळेच ही कविता स्त्रीचे तथाकथित ‘बोल्ड’ व अनिर्बंध चित्रण करत नाही. पण स्त्रीवादी कवितेसारखी स्त्री-वेदनांही तिच्यात येत नाही. उलट ती भारतीय अभिजातवादी परंपरेशी नाते सांगते. ही प्रेयसी संस्कृत परंपरेप्रमाणे अभिजात आहे.
रोमँटिक प्रेमाची कविता
              ग्रेस यांनी मुलाखतीत सांगितलेली आसक्ती आणि मीलन यांच्या मधली अवस्था कुठली असते? तर ती असते रोमान्सची! प्रेमानुभवाची- शरीरानुभवाची ओढ: पण प्रत्यक्ष मीलनाचा अभाव. यातून हा रोमँटिसिझम निर्माण होतो. हवेहवेसे वाटणारे पण प्रत्यक्ष न मिळालेले भागध्येय कवी शोधत राहतो, ते गवसते रोमँटिक प्रेमकवितेत. म्हणून ग्रेस यांच्या कवितेत प्रेयसीची वर्णने कशी येतात पहा:
             

              तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं
              तुझे केस पाठीवरी मोकळे
              इथें दाट छायांतुनी रंग गळतात
              या वृक्षमाळेंतले सावळे!
             
              तुझीं पावलें गे धुक्याच्या महालांत
              ना वाजली ना कधीं नादलीं
              निळागर्द भासे नभाचा किनारा
              न माझी मला अन् तुला सावली..

              जशी ओल जातां तुझ्या स्पंदनांतून
              आकांत माझ्या उरीं केवढा!
              तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणें
              दिसे की तुझ्या बिल्वराचा चुडा
              या कवितेतली प्रेयसी प्रत्यक्ष नाही. पाठीवरचे मोकळे केस आणि बिल्वरी चुडा इतकेच काय ते प्रेयसीचे दृष्यरूप. बाकी अमूर्तच म्हणजे हे रूप आहे कवीच्या मनातले. रोमँटिक.. म्हणून तर तिचे चित्र धूसर आहे. प्रेयसीच्या आसक्तीपोटी, मीलनाच्या अभावामुळे, संध्याकाळच्या अवस्थेत दाटून आलेल्या भावना-संवेदनेतून कविप्रतिभेने निर्माण केलेले कवीला भावलेले ते आभासी भावचित्र आहे. प्रेयसी आणि ऋतू व कवीच्या भावना इथे बेमालूम मिसळल्या आहेत. पहिल्या दोन ओळीत कवी प्रेयसीबद्दल तर दुसऱ्या दोन ओळीत निसर्ग व आपल्या भावना यांना प्रकट करीत जातो. त्यातून हे भावचित्र अमूर्त चित्रकलेतील  (Abstract Painting) चित्रासारखे रूप धारण करते.
प्रेमाचा अभाव आणि  आकांताचे देणे
              ग्रेसच्या कवितेत प्रेमाच्या अभावामुळे येणारा आकांत आहे. हा अभाव प्रेयसीचा आणि आईबद्दलचा तर आहेच; पण कधी तो प्रेयसी, आई आणि ईश्वर असाही आहे. म्हणून त्यांची प्रेमकविता मराठीत अनन्य आहे. ग्रेस यांच्या या प्रेमजाणिवेला डॉ. अक्षयकुमार काळे म्हणतात त्याप्रमाणे, आयुष्यातील भयाण पोकळी, एकाकीपणा, मृत्यूचे गूढ आकर्षण, ईश्वराच्या अस्तित्वाचे आभास इत्यादी गोष्टींचे संदर्भ येऊन मिळतात. कधी ईश्वर, प्रेयसी, मृत्यू यांची गुंफण होते: तर कधी जन्म, प्रेयसी आई यांची. डॉ. काळे यांच्या मते, “ईश्वरी अस्तित्वाच्या स्पर्शाने प्रेमकवितेला कधी स्पर्शाची धार येते तर कधी मृत्यूच्या जाणिवेने तिच्या अंगावर एक काटा फुलतो.” (ग्रेसविषयी, तत्रैव, पृ.१०४)
              इतकी व्यामिश्रता ग्रेस यांच्या प्रेमकवितेत आहे.
              तू येशील म्हणून मी वाट पाहतों आहे
            तीही अशा कातरवेळी,
            उदाच्या नादलहरीसारख्या
            संधीप्रकाशात....
            आणि आई नसलेल्या पोरासारखे हे माझे
            शहाणे डोळे हलकेच जोडून देतो
            नदीच्या प्रवाहात
            इथे मृत्यू, ईश्वर, प्रेयसी, आई यांची गुंफण आहे. कधी कधी तर कवीला आपल्या हताश आणि उदास अवस्थेत प्रेयसीचाच आधार वाटतो आणि तो तिच्या प्रेमाची याचना करू लागतो. तिच्याकडून प्रणयाची नव्हे तर जणू ईश्वरी कृपेची अपेक्षा करतो.
            जसें माझ्या आयुष्यातून उठून गेलें
            कुण्या मुग्ध मायाळू देहाचे मरण ..
            उर्मिले, माझ्यापुरते आणि ईश्वरासाठी तुझे हंसगीत
            उध्वस्त फुलांच्या परागांतून यावेत
            सोनेरी पावसाचे
            अनोळखी संदेश ...
            इथे कवीला आपण आणि ईश्वर यांच्यातला सेतू म्हणजे प्रेयसी वाटते. उध्वस्त फुलांच्या परागातून तिचे हंसगीत सोनेरी पावसाचे संदेश घेऊन यावेत अशी कवीची (रोमँटिक) अपेक्षा आहे.
            कधी कधी कवी-प्रेयसीचे मीलन होतेही. पण तो ‘साक्षात प्रेमानुभव’ कवी देत नाही. तर कधी तरी अनुभवलेला, कवीच्या स्मरणातला प्रेमानुभव संध्याकाळच्या प्रहरी अंतर्मनातून वर येतो, तो ते सांगतात. पण तिथेही अतृप्तीच प्रकटताना दिसते. पाहा:
            देहास आठवे स्पर्श
            तू दिला कोणत्या प्रहरी?
            की धुके दाटले होते
            या दग्ध पुरातन शहरी..
            अशी प्रेमाची संदिग्धताच कवीच्या मनात आहे. ग्रेसचे प्रेमगीत कवी नारायण सुर्व्यांसारखे तृप्तीचे नाही.
कामभावना आणि पाप संकल्पना
            दिलीप चित्रे किंवा अरुण कोलटकर यांच्याप्रमाणेच ग्रेसची कवितादेखील अस्तित्ववादी चिंतन मांडते. पण हे दोन कवी ‘प्रत्यक्ष’ प्रेमानुभवाला, मीलनाला, संभोगाला कवितेत चितारतात, तसे ग्रेस करत नाही. ते ‘रोमँटिक’ प्रेमानुभावाला चितारतात. कोलटकरी कविता कामवासनेचा वेध घेते. ग्रेसची कविता त्यातल्या रोमान्सचा वेध घेते.
            चित्रे- कोलटकरांच्या कवितेत प्रेमभावना-कामभावना आणि कामपूर्तीचा अनुभव येतो. ग्रेसच्या कवितेत कामगंड- सेक्स कॉम्प्लेक्सचा अनुभव येतो. कारण ग्रेसची कविता भारतीय परंपरेशी नाते सांगते. त्यामुळे भारतीय परंपरेतील पापभावना ग्रेस यांच्या कवितेत दिसते, ती चित्रे- कोलटकरांच्या कवितेत दिसत नाही. भारतीय परंपरेत कामपूर्तीवर धर्म आणि नीतीचे नियंत्रण आहे. या परंपरेत वैवाहिक कामपूर्ती नैतिक आणि अ-वैवाहिक कामपूर्ती अनैतिक मानली गेली आहे. चित्र-कोलटकर ही परंपरेची बंधने धुडकावून प्रेमानुभवाला कामानुभव व अस्तित्वाचा  एक अनुभव म्हणून पाहतात. कोलटकर तर त्यापलीकडे जाऊन प्रेमानुभवापेक्षा मानवी जन्मासाठीची एक अपरिहार्य प्रक्रिया म्हणून कामवासनेकडे पाहतात. तर ग्रेस यांना शरीरनिष्ठ कामवासना हा मानवाला मिळालेला शाप वाटतो. मानवी देहांत वासना कुणी व अशासाठी पेरल्या असा प्रश्न त्यांना पडतो. पाहा:
            शुभ्र अस्थींच्या धुक्यात
            खोल दिठीतली वेणा;
            निळ्या आकाश-रेषेंत
            जळे भगवी वासना    किंवा
            शरीर विणलें कुणी अतुट फाटली वासना
            तुझ्यांत भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धा उरे
            अरुण कोलटकर कामभावना बेधडक लिहितात. प्रत्यक्ष समागमाचे चित्रणही ते रेखाटत. कामपूर्तीची अवस्था अत्यंत कलात्मक भाषेत कोलटकर कसे चितारतात ते पहा:
            टचकन उमलते बेवारशी तृप्ती
            पाण्यात झुगारलेल्या सिगारेटसारखी
            पिकतात खपतात जन्मांध वांगी
             तृष्णाकाठी. स्पर्शजन्य कमळे
            एकामागून एक तोडत निळीफोल घोडी जाते.
            नसानसात चिवचिवणारी व्हीनस नासून जाते.
इथे प्रत्यक्ष संभोगाचे कलात्म चित्रण आहे. या अनुभवाकडे कोलटकर अ-सांस्कृतिक व केवळ अस्तित्ववादी भूमिकेतून पाहतात.
            ग्रेस कामानुभव एकतर रेखाटत नाही. रेखाटला तर स्पर्शानुभवापलीकडे तो जात नाही, गेला तर त्यांची पापसंकल्पना मध्येच जागी होते.
            या दु:खाचा कलश सावरे तुझ्या कटीची आण
            की हाताने हळू स्पर्शावें मीच माझे प्राण
             उभ्या घनांच्या शिखरांमध्ये तुटे जशी चांदणी
            मळवट-भरल्या केसांवरचे फूल तसे साजणी...
            संध्याकाळी मुका उभा मी मला सतीचा शाप
            कुठें पाहतो? अस्थींवरतीं सरसर चढती साप
            इथे पहिल्या दोन ओळीत स्पर्शानुभव, दुसऱ्या दोन ओळीत कामानुभव आणि तिसरया दोन मध्ये पापभावना स्पष्ट दिसते. आता आणखी काही ओळी पाहा:
            इथलीच कमळन,
            इथलीच टिंबे
            पाण्यामध्ये-
            फुटली बिंबें
            इथलेच उ:शाप,
      इथलेच शाप
            माझ्यापाशी-
            वितले पाप.
             इथे प्रणय सूचकपणे कवी व्यक्त करतो. तरीही त्याच्या मनात अपराधी भाव जागा होतो. कारण कवीच्या अंतर्मनात खोल दडून असलेली पापसंकल्पना होय.
पापसंकल्पनेकडून कामगंडाकडे
            भारतीय सांस्कृतिक धारणांना, त्यातील मूल्ये प्रमाणके, प्रतीके, मिथके यांना ग्रेसची कविता मान्यता देते आणि आपल्या कवितेतून हे सांस्कृतिक संचित मांडत जाते. ग्रेसचे समकालीन सुर्वे, चित्रे, कोलटकर जसे या सांस्कृतिक संचितांची चिकित्सा करतात तसे ग्रेस करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कवितेतील पापसंकल्पना पुढे जाऊन कामगंडाचे रूप धारण करते. त्यामुळे प्रणय रोमॅन्तिक राहतो व मीलनानुभव स्पर्शाच्या पातळीपर्यंतच पोचतो. त्यापुढे कवीचे मन अपराधी होते आणि पापाच्या दडपणातून हा गंड अधिक जागा होतो.            बहरांत दु:ख अनवाणी
            कीं पैलथडीची रात?
            माझाच स्पर्श सर्पाचा
            अमृतमय माझे हात ...
            ‘पैलथडीची रात्र’ असूनही आपल्या प्रणयाला काय नाव द्यावे? तो अमृतमयी (पुण्यरूप) की सर्पमय (पापरूप) या द्वंद्वात कवी अडकतो. त्यामुळे कवीला फुलांची शय्याही जळणारे रान वाटू लागते.
            सांज-घनाच्या मिटल्या ओळी
            मिटले माझे नयन निळे
            शिरीष फुलांच्या शय्येवरती
            क्षितिजावरचे रान जळे
            पारंपरिक प्रेमकवितेत निसर्ग प्रणयानुकुल असतो. इथे फुलांचे रान ‘जळत’ आहे. हे असे का होत असावे?
            कामगंडाकडून मातृगंडाकडे
            ग्रेस प्रेयसीकडे स्त्री म्हणून तर पाहतातच पण तिच्यातच ते मातृरूप शोधतात. त्यामुळे आई आणि प्रेयसी वेगळी राहत नाही. हे मदर फिक्सेशन आहे. या अवस्थेला मानसशास्त्रात इडीपस कॉम्प्लेक्स असे म्हणतात. हॅम्लेट आपल्या मातृगमनी काकांना का मारू शकत नाही. का? तर त्याला काकात आपलेच एक रूप दिसते. ज्या रुपाला मातेची सुप्त लालसा आहे, अंतर्मनाच्या- आदिममनाच्या पातळीवर.
            इथे कवी प्रेयसीशी का रत होत नाही? तर त्यालाही तिच्यात मातृरूप दिसते. त्यामुळेच त्यांच्या कवितेत पापभावना आणि कामगंड दिसतो
            माडांच्या परिघांत मी विझवल्या स्वप्नार्त चंद्रावळ
            डोळ्यांची बुबुळें तुझीं उलटता झाली धरित्री निळी ...
            तृष्णेच्या पहिल्या फुलास गिळतो माकंद ओठांतला
            कर्णाच्या घनतेंत की वितळतो संभोग कुंतीतला?
            प्रणयप्रसंगी कवीला कुंतीच्या अनैतिक समागमाचे आणि त्यातून जन्मास आलेल्या, पुढे कायम उपेक्षित राहिलेल्या कर्णाचे स्मरण होते. इथे केवळ कामगंड नाही, त्याच्या जोडीला मातृगंडही आहे. कर्ण- कुंतीच्या नात्याशी आपले-मातेचे नाते कवी जोडून पाहतो. या मातृगंडातूनच ग्रेसची दुर्बोधताही जन्मास येते.
            याबद्दल डॉ. जयंत परांजपे यांनी विवेचन केले आहे: “आईविषयी वाटणारे आकर्षण, तिचा द्वेष, लैंगिक जाणिवा व्यक्त करणाऱ्या प्रतिमांशी असलेला संपर्क, पित्याविषयीची शत्रुत्वभावना हे घटक मातृविषयक गंडाकडे अंगुलीनिर्देश करतात व यातूनच दुर्बोधता निर्माण होते. या गंडाचा कवीच्या भावजीवनाशी व नीतिविषयक कल्पनांशी इतका जवळचा आहे की कवी स्वतःच्या नकळत आपल्या हेतूंना स्वप्नसदृश्य दुर्बोधतेच्या धुक्यात वितळून टाकतो.” (डॉ. जयंत परांजपे, ग्रेस आणि दुर्बोधता, ग्रेसविषयी, डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या ग्रंथातून उधृत, पृ.११९)
            तू आठवणीतुन माझ्य
            कधी रंगित वाट पसरशी
            अंधार-व्रताची समई
            कधी असते माझ्यापाशी
            तूं मला कुशीला घ्यावे
            अंधार हळू ढवळावा...
            संन्यस्त सुखाच्या कांठी
            वळीवाचा पाऊस यावा
            अशी अपेक्षा त्यामुळे अपेक्षाच राहते, कवीची प्रेमाची असोशीही तशीच राहते आणि वेदना आकांत वाढतच जातो.
पुरुषत्वातून स्त्रीत्वाचा शोध
            स्त्रीला विभिन्न पातळ्यांवर समजून घेणे हाच मला पुरुषार्थ वाटतो.’ असे ग्रेस यांनी म्हटलेच आहे. त्यामुळे स्त्रीच्या सर्व रूपाचा शोध तर ते घेतातच, शिवाय सर्व अंगांनी ते शोध घेतात, अगदी शरीरावयवापासून ते तिच्या मेंदी-बिंदीपर्यंत! हा शोध इथेच थांबत नाही. आई आणि प्रेयसी यांच्याबद्दलची तीव्र असोसी त्यांना स्त्रीरुपाचा शोध स्वत:मध्येच घ्यायला लावते.
            मानसशास्राच्या ते, मानसिक पातळीवर प्रत्येकच पुरुषात एक स्त्रीत्वाचा पैलू (अॅनिमा) असतो. आणि स्त्रीत पुरुषत्वाचा पैलू अॅनिमस असतो. (जैविक पातळीवर इस्ट्रोजेन आणि इंड्रोजेन संप्रेरके आहेतच; आपल्या भारतीय मिथक कल्पनेत अर्धनारी नटेश्वर ही संकल्पना आहेच.) हा व्यक्तिमत्वाचा भाग असल्याने समग्र व्यक्तिमत्त्व कलेत जेव्हा प्रकटते, त्यावेळी हा पैलूही कलेत प्रकटतो. संतांच्या विराण्यातही आपल्याला हे दिसते. ज्यात, पुरुष भक्त स्त्रीरूप घेऊन परमेश्वराला प्रियकर मानतो. कवी ग्रेस यांच्या कवितेतही स्वत:च्या स्त्रीत्वाचा शोध दिसतो. त्याचे विश्लेषण डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले आहे. (संध्याकाळच्या कविता: एक आकलन, दै. सामना, नागपूर, १२ डिसेंबर १९९९.) ग्रेस यांच्या प्रेमकवितेचा हा अनन्यसाधारण विशेष आहे.
            वळत वळत पावलांत
            वाट गुंतली पिशी
             किंवा
            माझ्या वक्षी
निजती पक्षी
अतुल सुखाची ही धारा
देह अनावर
निज मातीवर
            हिम वर्षावत ये वारा...या तिन्ही कडव्यात स्त्रीचे मनोगत आहे. पुरुष कवींच्या कवितात स्त्रीचे मनोगत येते, पण तेथे असा आपल्यातील स्त्रीचा शोध नसतो, तर ते नाट्यकाव्य असते. कवी, स्त्री पात्राच्या मुखातून बोलतो. इथे तशी बाह्य पात्रे नाहीत. ती कवीच्या अंतर्मनाच्या रंगमंचावरीलच आहेत. या कडव्यांत अनुक्रमे स्त्रीचा सखीसंवाद आणि आत्मसंवाद आहे. तो कवीनेच साधला आहे. कारण ते नाट्यगीत नाही. नाट्यगीतासाठी कवी आणि पात्र यांत द्वैत असावे लागते. कवीची वृत्ती बहिर्मुख असावी लागते आणि अनुभव बाह्य असावा लागतो. या कवितांत विषयाचे अद्वैत आहे, कवी अंर्तमुख आणि अनुभव आंतरिक आहे.
            उगीचच वाटत असते तुलाही आणि मलाहि,
            पाय ठेवूं तेवढी भूमि घसरून पडेल...
            तरीहि वाट हात जोडून उभी असते.
            हवी असते वाऱ्यालाही इतक्यात अंगाई
            म्हणून मांडतो मीहि; कमळांच्या पानांवर
            टिंबांचा खेळ...
            तुला निजविण्यासाठीं सांगितलेली एक कथा.
            इथे पहिल्या दोन ओळीत, तिच्या आणि त्याच्या पाय घरून पडण्याची पापभावना जागी होते. पुढच्याच दोन ओळीत हे व्दैत बाजूला पडते आणि कवी भोवतालच्या निसर्गाशी एकरूप होतो. त्याचवेळी हे भोवतालचे विश्व आपल्याकडे मातृप्रेमाची याचना करत आहे अशी जाणीव कवीला होते. त्याला आपले पोरकेपण आठवते. आपल्याप्रमाणेच वाऱ्यालाही मातृप्रेमाची गरज आहे असे जाणवते. पण कवीची आणि विश्वाची माता आहेच कुठे? पण मग कवीलाच मातृप्रेमाचा पान्हा फुटतो आणि तोच अंगाई-कथा सांगू लागतो. तोच विश्वाची माता होतो. कवीचे हे रूप खूप महत्त्वाचे आहे. अॅनिमाचा तो उत्तुंग आणि उदात्त आविष्कार आहे.
            अभावग्रस्त आणि पोरक्या कवीचे माता आणि विश्वमाता यांत रुपांतर होणे, ही निर्मितिप्रक्रियेतील अत्यंत विलोभनीय आणि प्रातिभ घटना आहे. इथे कवी संतपदाजवळ जातो. विश्वाचे आर्त समजून घेतो आणि स्वतःच विश्वासाठी अंगाईगीत गाऊ लागतो. दुभंगलेल्या मानसिक अवस्थेतूनही किती सौंदर्यपूर्ण रचना होऊ शकते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
            मनोविकृतीकडे जाण्याची शक्यता असलेल्या अनुभवाला ग्रेसच्या अव्वल आणि अस्सल प्रतिभेने दिलेले हे सौंदर्यशिल्प आहे. खरेच प्रेमकवितेचे हे विलोभनीय स्वप्न ग्रेस यांनी दुर्बोधतेच्या संगमरवरातच लपवून ठेवले आहे;  ते आपण आपल्या सौंदर्यदृष्टीनेच शोधायाचे आहे.
 (टीप: सदर लेखातील सर्व काव्यओळी ‘संध्याकाळच्या कविता’ काव्यसंग्रहातील आहेत.)

पूर्वप्रसिद्धी : 
१. युगवाणी, कवी ग्रेस विशेषांक, संपा. अजय देशपांडे,  विदर्भ साहित्य संघ, नागपूर, २०१३
२. कवितेचा अंत:स्वर, डॉ. देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन, पुणे,  २०१८ 
(सदर लेख 'ग्रेस : वेदना आणि सौंदर्य'  संपा. अजय देशपांडे , विजय प्रकाशन, नागपूर, २०१५ ग्रंथात समाविष्ट)

कवी ग्रेस : इराणी संगीताच्या प्रतिमा

आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी संगीताच्या प्रतिमा... मला आलिंगनात मरण तसा रात्रीचा शृंगार, तुझे चांदरातींचें अर्...