Tuesday, May 5, 2020

कवी ग्रेस यांची देवी : शोध सृजन, मातृत्व आणि संहारक तत्त्वाचा

-------------------------------------------------------------------------------------------------------------------
            पूर्वसंचिताचे नभ गेले संध्येला आंदण
आली पालखी दाराशी देवी चढल्या वाकून.
जेथे दिसला प्रकाश त्याच्या वेचल्या मी छाया
काळ्या कभिन्न भोयांची नको कातडी मळाया...
पूर्वी पालखीच्या पुढे कांही आले होते वेडे
त्यांना जुंपायाचे होते दिव्य संभवाचे घोडे
कोणी धाडला सांगावा कोणी मागला जोगवा
अशा फेराफेरीमध्ये गेला वाढत दुरावा...
आता पुरुषाची पाळी खांदा पालखीचा भार
आणि देवींनी घेतल्या दोन मांजरी गर्भार
आंत काळोख म्हणुनी रत्न पिळले देवींनी
भोई पालखीचे गीत घेती थोडे वाकवूनी
देवी पोटातली लय मग काळजाला नेती
दोन मांजरीची नखे अशी खुपणार किती?
देह सुकुमार बाई त्याला मायेने सोलावा
ज्याला पुरती वल्कले तोच शोभतो नागवा...
लागे पालखीला झळ गर्द रानातल्या वाटा
एका भोयाच्या पायात गेला बाभळीचा काटा.
जीर्ण झोपाळ्यासारखा ढळे पालखीचा तोल
जसा स्वप्नातला शीण आणि आत्म्यातील कळ.
देवी फोडती अंगठी हाती हिऱ्याचा प्रहार
वेग तोलून चिरती त्याच्या दंडांतील शीर...
तसे पायातले रक्त झाले पाचोळ्यात गोळा
जशी आणखी गोठली एक कैवल्याची शिळा...
तळहाताचा दिलासा असा सोडला दिव्यांत
आता वाटले देवींना मोती भरावे भांगात...
आले मेंदूच्या घळींत मेल्या नदिचे स्मरण
रत्नमंडळाचे डोह तिच्या पात्रात  भयाण
एका मांजरीचे नख त्यांना वाटले मनस्वी
त्यांना स्तनांचे गोंदण वाटे करावे तेजस्वी...
थोड्या वेळाने पालखी भुईस्पर्शाला वाकेल
चार भोयांचा चेहरा मुकें आकाश झांकेल..
देवी उतरल्या खाली माझ्या अंगोअंगी बळ
आता सोसेल कां मला त्यांच्या मिठीतली झळ?
सुन्या पालखीत आता आता दोन मांजरीची ठेव
कैसे सांभाळावे त्यांनी उष्ण पोटातले जीव?
पाराअपाराच्यामध्ये उभें किनाऱ्यात धुकें
चिंध्या पांघरुन राजा शोधे आपुले परके...
काही तोडलेली बोटें काही मोडलेल्या नावा
उभ्या उभ्याच लागला त्यांचा देवींना सुगावा...
आणि दर्वळले पाणी थेट ओलांडुनी घाट
           भव्य शैलीने चुंबिले त्याने देवींचे ललाट

                           - ग्रेस, चंद्रमाधवीचे प्रदेश, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९७७
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
कवी यांची ही ‘देवी’ एक अद्भुत कविता आहे. शीर्षक ‘देवी’ असले तरी कवितेचा आशय ‘देवीची पालखी’ असा आहे. आपल्या परंपरेत देवाची पालखी वाहून नेणे हा श्रद्धेचा, उपासनेचा आणि विधीचा भाग आहे. अशाच एका पालखीच्या विधीप्रसंगाचे दर्शन या कवितेत आहे. मात्र ‘दर्शन’ म्हणणे थोडे तारतम्यानेच घेतले पाहिजे. कारण कुठल्याही दृश्याचे वा प्रसंगाचे स्थिर दर्शन घडवणे, हा कवी ग्रेस यांचा स्वभाव नाही. त्यामुळे इथेही नुसते पालखी वर्णन नाही; देवीच्या पालखीचे दृश्य, कवीच्या स्मृतीतील अनुभव आणि त्या निमित्ताने कवीच्या जागृत झालेल्या भावना-विकारांचे प्रकटीकरण, स्त्रीच्या आदिम रूपाचा, तिच्या संहार, मीलन आणि मातृत्व शक्तीचा शोध असे कवितेचे स्वरूप आहे. या शोधात, भारतीय पारंपरिक धारणा आणि मिथके यांना ग्रेस कुठेही धक्का देत नाहीत. त्यामुळे ज्या ठिकाणी त्यांच्या भावना पापसंकल्पनेला, नैतिकतेला बाधा आणत असतील, तिथे ते सुबोधतेचा धागा सोडून गूढतेचा आसरा घेत जातात. त्यामुळे वाचकाला कविता अधिक दुर्बोध वाटत जाते. (अर्थात हे ग्रेसांना हवेच असते) तरीही तिच्यातील अ-पूर्व अनुभव, धक्कातंत्र, प्रतीके-प्रतिमा, मिथके, आंतरिक लय आणि भाषाशैली यामुळे ती वाचकांचा कब्जा घेते. अधिक झपाटून टाकते.
          हा अनुभव ‘देवी’ वाचतानाही येतो.
          पूर्वसंचिताचे नभ गेले संध्येला आंदण
          आली पालखी दाराशी देवी चढल्या वाकून
            संध्येला नभ आंदण जाण्याच्या वेळी म्हणजे, संध्याकाळी या पालखी सोहळ्याला सुरुवात होते. भक्त देवीला पालखीत घालत नाहीत तर देवीच पालखीत वाकून चढल्या, असे सांगून ते देवीना सजीव करतात. एवढेच नव्हे तर, देवीचे पुढील सर्व वर्णन सजीव वर्तन म्हणूनच समोर येते. त्यामुळे ही कविता एका धार्मिक सोहळ्याचे वर्णन न राहता ती एक तरल आदिबंधात्मक शोधाची प्रक्रिया बनते. हेच तर ग्रेस यांचे वैशिष्ट्य आहे. वर्णन करणे हा व्यावहारिक भाषेचा गुणधर्म असतो. ग्रेस भाषेच्या सर्जनशक्तीला भिडतात. ते तिच्या माध्यमातून स्थलकालव्यक्ती प्रसंगाच्या पलीकडे आपला अनुभव नेतात. तिचा विस्तार मानवी संस्कृती, मन-अंतर्मन, आदिममनापासून सांस्कृतिक संचितापर्यंत करतात आणि अभिव्यक्ती प्रतीकात्मक करतात.
          या कवितेतही प्रारंभीच ‘पूर्वसंचित’ शब्द वापरल्याने आशयाला एक सांकृतिक आणि आध्यात्मिक संदर्भ जोडला जातो. जन्म आणि पुनर्जन्म, संचित व पूर्वसंचित असे भारतीय संदर्भ त्यामुळे जागे होतात. अर्थात देवी या परिघाशी ते आपसूक जुळलेलेच आहेत. तर ग्रेस शब्दयोजनेतून अशी भाषेची सर्जक शक्ती वापरतात आणि दृश्य जणू समोरच घडते आहे, अशी अशी अनुभूती देतात.  देवीचा पालखी सोहळा आता रंगतो आहे. जिथून देवी उचलल्या जातात त्या जागेला नमस्कार करून पायधूळ कपाळाला लावली जात आहे. मात्र या साध्या कृतीला ग्रेस गूढता प्राप्त करून देतात.
          जेथे दिसला प्रकाश त्याच्या वेचल्या मी छाया
          काळ्या कभिन्न भोयांची नको कातडी मळाया...
          देवीच्या स्थानावरची माती कपाळाला कवी लावतो. ही ती साधी कृती. मात्र, देवी म्हणजे प्रकाश तर तिचे स्थान म्हणजे ‘छाया’ ! त्या छायेच्या प्रकाशाने आधीच काळ्या असलेल्या भोयांची कातडी अधिक मळू नये असे कवीला वाटते. असे शब्द योजून ते कवितेची उंची वाढवतात. या ‘धुलि’वंदनानंतर देवी असलेल्या पालखीच्या समोर भक्त नाचू लागतात. कवी त्यांना ‘वेडे’ म्हणतो. कारण काही देवीचा सांगावा गेलेले, तर काही जोगवा मागत नाचणारे, तर काहींच्या अंगात आलेले आहे. असे सारे ‘वेडे’ आणि पालखी पुढील ‘घोडे’ नाचत नाचवत पालखी अधिक रंगते. मात्र हे घोडे पाहून कवीच्या अंतर्मनात एका विधीचा संदर्भ जागृत होतो. त्यामुळे कवी या घोड्यांचा उल्लेख ‘दिव्य संभवाचे घोडे’ असा करतो. काय आहे हा दिव्य संभव?
          डॉ. मधुकर वाकोडे यांच्या मते, अश्वमेध यज्ञप्रसंगी राणी व अश्व यांच्या प्रतीकात्मक संभोगाचा प्रथावशेष हाच ‘दिव्य संभव’. “दिव्य संभवाच्या कल्पनामध्ये घोडे, वळू, रेडे ह्या शक्तिशाली वाहकांना महत्वाचे स्थान होते. घोडे दैवी रथाचे, नंदी पशुपतीचे नि रेडे मातृकेचे वाहक बनले...मानवीय पातळीवर हे असंभव असल्याने पौरुषयुक्त पुरुषांना सृजनासाठी मातृकेची पालखी वाहणे क्रमप्राप्त होते.” (डॉ. मधुकर वाकोडे : २०१५ : २०७)
          दिव्य संभव या उल्लेखामुळे, पालखी दैवी देवीची आहे, म्हणून घोडे नाचवले जात आहेत, ती मातृका आहे, त्यामुळे पुरुष सृजनासाठी तिची पालखी वाहत आहेत, त्यासाठी भक्त ‘वेडे’ झाले आहेत, हे कळते. अशा ‘वेड्या’ आणि ‘घोड्या’च्या ‘फेराफेरी’ मुळे पालखी पाहणारा कवी आणि पालखी यात ‘दुरावा’ निर्माण होतो. त्याला जवळ जाता येत नाही. मात्र पालखी पुढे सरकते, तेव्हा या पालखीचा भार वाहण्याची पाळी सामान्य माणसावर येते. पालखीला खांदा देऊन सृजनाचे पुण्य मिळवण्याची संधी इतर पुरुषांनाही मिळते. कवीलाही मिळते आणि दुरावा संपतो.
          इथपर्यंत कवी पाहिलेल्या दृश्याचे वर्णन करतो. पुढच्याच ओळीत मात्र कवी आपल्या मूडमध्ये जातो. त्याचे मन या दृश्यापासून पार मागे जाते. त्याला देवीच्या या दैवी रूपामागच्या ‘रौद्र’ (संहारक) आणि ‘मातृका’ या रुपाची आठवण होते. यातील पहिले म्हणजे रौद्र रूप ‘कालीचे’ आहे. काली ही नरसंहारक अशी देवी. काली म्हणजे स्त्रीचे आदिम व संहारक रूप. ग्रेस यांनी हे कालीरूप कुठे अनुभवले असेल?
          डॉ. वीणा आलासे यांनी ‘मायानगरीचा पाहुणा’, या लेखात ग्रेस त्यांच्या आईच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी कलकत्याला आल्यानंतर पहिल्यांदा कालीमातेच्या दर्शनाला आले, तो अनुभव सांगितला आहे. त्यावेळी या देवीबद्दलच्या काही कथा आलासे यांनी ग्रेस यांना सांगितल्या. त्या म्हणतात, “शाक्तपंथ, बाऊलपंथ, सह्जीया बौद्ध इत्यादींची माहिती दिली. बंगालमधील प्रचलित मातृपूजेचा संदर्भ सांगण्याचा प्रयत्न केला. दर्शनापूर्वी हे सर्व माहित असले तर देवीचे सर्वमंगल रूप प्रकर्षाने जाणवते...झालेही तसेच. ग्रेस मन:पूर्वक ऐकत होते. त्यानंतर कालीच्या दर्शनानेही ते भारावून गेले. त्या परिसराचा त्यांना प्रातिभ साक्षात्कार झाला असावा. कारण त्यानंतर त्यांची ‘वैखरी’ ही कविता प्रकाशित झाली. शाक्तपंथाचे उल्लेख त्यांच्या या कवितेत वारंवार येउ लागले...वैखरी या कवितेतील, ‘मी शाक्तपंथी तुवा स्पर्श द्यावा, स्तनांचा तरंगून ये वैखरी’ ही ओळ वाचली की मला त्या दिवशीच्या पहाटेच्या कालीदर्शनाची आठवण येते...१९७८-७९ सालानंतर त्यांच्या लेखनात जे काही नवे उल्लेख येऊ लागले त्यांचा या पहाटेच्या देवीदर्शनाशी काहीतरी संबंध आहे असे वाटते खरे.” (वीणा आलासे : २०१३: ४५)
          याचा अर्थ ग्रेस ज्या देवीच्या पालखीचे दृश्य सांगत कवितेला सुरुवात करताहेत त्यातील देवी ‘काली’ आहे. पण ते अशा स्थिर अनुभवात रमत नाहीत. तर ते, स्मृती, वाचन, मनन, चिंतन, मन, अंतर्मन, कथा, दंतकथा, पुराणकथा, विविध पंथ आणि त्यांच्यां उपासनापद्धती, त्या त्या पंथाच्या धारणा यांना एकत्रच शब्दबद्ध करत जातात. त्यामुळे वाचक झपाटून जातो. त्याला या देवीची विविध रूपे कवी दर्शवीत जातो, मात्र ती रूपे वस्तुनिष्ठ नसतात, तर कवीच्या मन-अंतर्मनातील आहेत. त्यामुळे ती गूढ वाटू लागतात.
          देवीचे दुसरे रूप म्हणजे ‘मातृका’. इथे जी मातृका आहे, तीच संहारकही आहे. त्यासाठी कवीने एक प्रतीक वापरले आहे, ते मांजरीचे. कारण मांजर पशुतील मातृरूप आणि संहारक रूपाची प्रतिनिधी आहे.
          डॉ. मधुकर वाकोडे यांच्या मते, “सृजनाच्या क्षेत्रात मांजर ही देवीची प्रतिनिधी लोकमानसाने स्वीकारली. लोकजीवनात ती ‘सटी’ म्हणून प्रतिष्ठित झाली. सटीचे नवरात्र काय, षष्ठीचे पूजन काय, हा लोकाचार. ‘देवी’ हा रोग मांजरीस बाधत नाही...मांजर ही बहुप्रसवा. पण तिच्या प्रसवशक्तीत क्रौर्यही दडलेले आहे. पहिले वेत खाऊन तृप्त होणारी ही मातृका.” (मधुकर वाकोडे: २०१५: २०७) याचा अर्थ संहारक आणि मातृका रूपाचे प्रतीक आहे, मांजर. कारण ती अनेक वेत देते आणि आपले पहिले अपत्य खाऊन टाकते. देवीही तशीच तर आहे.
          देवीचे रूप हे संहारकही आहे आणि मातृका रूपही. म्हणजे ती कालीही आहे आणि रेणुकाही. पालखीच्या निमित्ताने ग्रेस या दोन्ही रूपाचा शोध घेतात. त्याचेच प्रतीक मांजर. मांजर जन्माला आलेले आपले पहिले अपत्य खाऊन टाकते आणि मग इतर पिल्यांचे पोषण करते अशी लोकधारणा खुद्द कवी ग्रेस यांनी एका कवितेत साकारली आहे.
          दु:खास माझिया का दृष्टांत सोसवेना
          खाऊन वेत पहिले या मांजरीस तृष्णा
          शोधून काढले मी ते कूळही करंटे
          पहिल्या वधास लागे काळीज फार मोठे.
                      (‘कावळा’, चंद्रमाधवीचे प्रदेश, पृ.१७३)
          हे लक्षात घेतले म्हणजे ‘देवी’ मधील खालील ओळींचा अर्थ स्पष्ट होत जातो.  
          आणि देवींनी घेतल्या दोन मांजरी गर्भार
          आंत काळोख म्हणुनी रत्न पिळले देवींनी
          कवी अशी कल्पना करतो की, गर्भातील काळोख दूर व्हावा म्हणून देवी जणू दोन गर्भरूपी प्रकाशरत्ने पिळून आत घेत आहेत. संहारक रूपाच्या आतच मातृका रूप दडले आहे. तसेही गाभारा हा शब्द ‘गर्भार’ या शब्दाचा वाचक आहे. या गाभाऱ्यात काळोख असतो म्हणून दिवा उजळला जातो. गाभारा हा गर्भाशयाचे आणि दिवा (रत्न) हे गर्भातील जीवाचे प्रतीक आहे. हे सांस्कृतिक आदिबंध या कवितेत प्रकटत जातात. म्हणूनच जेथून देवी उचलल्या ते स्थान आधी रत्नरुपी ‘प्रकाशाचे; आणि देवी उचलून नेल्यानंतर ते ‘छायेचे’ असे म्हटले आहे. आता पुढचा विधी. तो आहे, देवीच्या आवाहनपर गीतांचा.
          भोई पालखीचे गीत घेती थोडे वाकवूनी
          देवी पोटातली लय मग काळजाला नेती
          दोन मांजरीची नखे अशी खुपणार किती?
          देह सुकुमार बाई त्याला मायेने सोलावा
          ज्याला पुरती वल्कले तोच शोभतो नागवा...
          आता पालखीच्या जल्लोषात तिच्यावरील गीतांची भर पडली आहे. गीत गाणारे बेंबीच्या देठापासून गाऊ लागतात. हा स्वर पुरुषाच्या नाभीपासून सुरू होतो आहे, मात्र त्याची लय पार मातृरूपी देवीच्या गर्भापर्यंत पोचते आहे. तेथून तिच्या काळजापर्यंत पोचते आहे. या पुरुषी स्वरांना कवी ‘मांजरीची नखे’ संबोधतो. मांजरीची नखे याचा अर्थ डॉ. वाकोडे यांनी, ‘अनिष्ट निवारणासाठी मांजरीच्या दैवी नखाने आपले दोन्ही स्तन पयोधरेने गोंदवून घेण्याचा विधी’, असा घेतला आहे. त्यांच्या मते, गर्भधारणेच्या प्रक्रियेतील ही एक क्रिया आहे. गर्भधारणेच्या आधी मांजरीच्या नखाने (म्हणजे संहारक व मातुका प्रतिनिधीच्या नखाने) स्तनांवर गोंदवून घेतले की मग कशाचीही बाधा होत नाही. (मधुकर वाकोडे: २०१५: २०८) हे समजून घेतले की ‘देवी पोटातली लय मग काळजाला नेती| दोन मांजरीची नखे खुपणार किती’ याचा अर्थ कळतो.
          अशा प्रकारे ग्रेस देवीच्या संहारक व मातृका रूपापासून तिच्या आदिम रूपापर्यंत पोचतात. हे आदिम रूप प्रकृतीचे आहे. पुरुष आणि प्रकृती, नर आणि मादी यांच्या मीलनाचे आदिबंध कवी ग्रेस इथे शोधत आहेत. या मीलनप्रक्रियेचे प्रतीकरूप म्हणजे स्तन नखाने गोंदवणे आणि पोतराजाने चाबकाचे फटकारे अंगावर मारून घेणे. मुळात ‘नखक्षत’ आणि ‘लत्तिकाप्रहार’ हे कामउत्तेजनेचे विधी आहेत. (नंतर ते प्रतीकात्मक धार्मिक विधी बनले आहेत.) वात्सायनाने नखक्षते केव्हा करावी याची यादीच दिली आहे. त्यापैकी एक, कामवासना प्रबळ झाली असता नखक्षते करावीत, असे म्हटले आहे.
          म्हणजे देवीचा उत्सव हा केवळ एक धार्मिक कर्मकांड नाही तर तो लोकधारणा आणि यातूविधीचा भाग आहे. ज्यात पुरुष-प्रकृती मीलनातून सृष्टीची निर्मिती होते, असे मानले आहे. यालाच आदिपुरुष आणि आदिमाया यांचे मीलन मानले जाते. हीच ती अंबा. ‘आदिमाय अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई.’ अशी आई ती हीच, तीच सृजनदेवता. म्हणून तर तिला, ‘उदो, उदो’, असे आवाहन. अशा सृजनासाठी कामप्रबळ होण्याचा विधी तो कोणता? तर देवीचा चाबूक अंगावर मारून घेण्याचा. हा चाबूक किंवा आसूड मुळात ‘कामोत्तेजक लत्ताप्रहार’ आहे.
          ‘गाथा सप्तशती’त नवलताप्रहाराचे उल्लेख आहेत. त्यात, ही संज्ञक कामक्रीडा आहे, तसेच धार्मिक विधीही आहे, असे म्हटले आहे. ही क्रीडा केवळ भारतात नाही तर जगभर आहे. रोमन सौंदर्यदेवता व्हीनस हिला तिच्या गणिका, कामकौशल्याचे प्रतीक म्हणून लगाम आणि चाबूक अर्पण करीत असत. तसेच लुपरकस या दैवताच्या संतुष्टीसाठी दर पंधरा फेब्रुवारीला रोमन स्त्री-पुरुष जंगलात जमून नग्नावस्थेत असलेल्या स्त्री-पुरुषांच्या अंगावर, विशेषतः स्त्रियांवर कोरडे ओढत. स्त्रियाही हे फटकारे चुकवीत नसत. कारण प्रहाराच्या वळामुळे देव संतुष्ट होतो व संतानप्राप्ती होते, अशी त्यांची धारणा होती. अशा लत्ताप्रहराचा पाश्चात्य काव्यातील पहिला उल्लेख रोमचा बादशहा नेरो (इ.स. ३७ ते ६६) याचा सचिव पेट्रोनियस याच्या ‘सॅटिरिकॉन’ या काव्यात आढळतो. हे सांगून जोगळेकरांनी, “कडकलक्ष्मीचा आसूड आणि काळूबाईचा चाबूक व वेत ही प्रतीकेही लैंगिक आहेत”, असे म्हटले आहे. (स. आ. जोगळेकर : २०१२ : ३८५)  
          याचा अर्थ, आदिमातेने सृष्टीची निर्मिती करावी व प्रसवाच्या वेळीच आपल्या पिल्यासारख्या अपत्याचे पोषण करावे, मांजरीसारखा संहार करू नये, सृजनासाठी आतुर व्हावे, त्यासाठी उत्तेजना वाढावी, यासाठी केलेले ‘नखक्षते’ व ‘आसूडप्रहार’ हे विधी आहेत. कवितेतील ‘पालखीचे गीत’ आणि ‘देवी पोटातली लय मग काळजाला नेती’ यातील गीते म्हणजे या सृजनाचेच आवाहन आहे. या आवाहनातच पोतराजाने अंगावर फटकारे मारून स्वत:ला रक्तबंबाळ करून घेणे आणि देवीला प्रसन्न करून घेणेही आहे. कारण हा कामुक लत्ताप्रहराचा प्रतीकात्मक धार्मिक विधी आहे. कमरेला फाटक्या चिंध्यां बांधलेला पोतराज उघड्या अंगावर सपासप चाबकाचे फटकारे मारून घेतो, हा या विधीचाच भाग. पण प्रश्न असा आहे, जर, चाबूक, वेत हे लैंगिक प्रतीक, तर पोतराजाने अंगावर आसूड ओढणे ही क्रिया काय सुचवत आहे? आता कवितेतील या ओळी नीट पाहा-
          देह सुकुमार बाई त्याला मायेने सोलावा
          ज्याला पुरती वल्कले तोच शोभतो नागवा...
          हा उल्लेख पोतराजाचा आहे. सुकुमार देहाचा, फाटकी वल्कले असलेला, भक्त म्हणून शोभणारा हा पोतराज जणू अर्धा नागवाच आहे. कवितेत पुढेही, ‘पाराअपाराच्यामध्ये उभें किनाऱ्यात धुकें | चिंध्या पांघरुन राजा शोधे आपुले परके...’ असा उल्लेख आहे, तोही पोतराजाचाच आहे.         
          या पोतराजाचे अधिक स्पष्टीकरण डॉ. मनोज मनोज तायडे यांच्या ग्रेसांच्या ‘आई’ कवितेवरील लेखाने होते. “माणसाचा जन्म म्हणजे दोन्ही देहाचे सोलले जाणे. सोलणारा आणि सोलून घेणारा, दोन्ही देह एवढे सुकुमार की, नख लागले तरी रक्ताची धार लागावी...आदिशक्ती, मातृशक्ती..मातृशक्ती प्रकृतीच्या कुशीत ‘नागडे’ राहणे ‘पुरुषा’ला शोभते..प्रकृतीच्या कुशीत पुरुष नेहमीच नागडा असतो. मग ती प्रकृती पत्नीच्या रुपात येवो वा मातेच्या.” (मनोज तायडे : २०१५ : २३०-२३३)
           याचा अर्थ हा पोतराज हा ‘पुरुष’ आहे, तर देवी ही ‘प्रकृती’ आहे. पुरुष आणि प्रकृती यांच्या मीलनातून सृष्टीची निर्मिती होते, ही भारतीय धारणा या देवी कवितेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे पालखीच्या दृश्याचा अनुभव सांगणे, देवीचे महात्म्य सांगणे हा कवीचा हेतू नाही, तर पुरुष-प्रकृती यांच्या यांच्या मीलनाचा, सृजनाचा शोध घेणे, देवीच्या आदिमायेच्या रूपाचा, तिच्या संहारक आणि मातृका रूपाचा वेध घेणे, हा आहे.
          अशा तऱ्हेने, नखक्षते करण्याची क्रिया, गर्भार मांजरीचे मातृका व संहारक रूप, आवाहक गीते, पोतराजाचे फटके मारणे, ‘आदिपुरुष’ ही कवितेतील प्रतीके उलगडत जातात. मांजरीचे प्रतीक उलगडले की मग, ‘दोन मांजरीची नखे अशी खुपणार किती?..एका मांजरीचे नख त्यांना वाटले मनस्वी |त्यांना स्तनांचे गोंदण वाटे करावे तेजस्वी...सुन्या पालखीत आता आता दोन मांजरीची ठेव | कैसे सांभाळावे त्यांनी उष्ण पोटातले जीव?.. या साऱ्याच ओळींचा उलगडा होत जातो.
          याचा अर्थ देवीचा हा सोहळा एकाच वेळी अध्यात्म, मीलन, सृजन, मातृत्व आणि संहारक यांचा प्रतीकात्मक विधी आहे. ग्रेस हे अनुभवाचा एकपदरी असा शोध कधीच घेत नाहीत. इथेही देवी, संभोग, सृजन, मातृत्व आणि संहार, यांचा ते एकात्म शोध घेत आहेत. खरे तर हेच सृष्टीचे म्हणजे आदिमायेचे रूप आहे. संभोग, सृजन, मातृत्व आणि संहार हा सृष्टीचाच आदिबंध आहे.
          अर्थात, हे तत्त्वज्ञानात ठीक आहे, माहिती म्हणून बरोबर आहे, पण ग्रेस आपल्याला तो काव्यानुभव म्हणून देत आहे, हे विशेष. देवीच्या पालखीच्या विधी निमित्ताने ग्रेस त्यांचा अनुभूतीतून हा शोध घेत जात आहेत. माहिती किंवा ज्ञान एका दृश्याच्या किंवा विधीच्या निमित्ताने काव्यानुभव होत आहे, हे कवीच्या अव्वल प्रतिभेचे सामर्थ्य आहे.  
          लागे पालखीला झळ गर्द रानातल्या वाटा
          एका भोयाच्या पायात गेला बाभळीचा काटा.
          जीर्ण झोपाळ्यासारखा ढळे पालखीचा तोल
          जसा स्वप्नातला शीण आणि आत्म्यातील कळ.
          या ओळीत पुन्हा पालखीचे दृश्य वर्णन येते. म्हणजे स्मरणातून जागे होत पुन्हा पहिल्या दृश्यावर लक्ष वळविले जाते. आता पालखी गर्द रानातून जात आहे, पालखी वाहणाऱ्या अनवाणी भोयाच्या पायात बाभळीचा काटा रुततो, त्यामुळे त्याचा तोल जातो आणि पालखीही जीर्ण झोपाळ्यासारखी एका बाजूला झुकते. त्याला कवीने ‘स्वप्नातला शीण आणि आत्म्यातील कळ’ अशी अप्रतिम प्रतिमा वापरली आहे.
          कवितेत पुढे आणखी गूढ वाटणाऱ्या ओळीतही विधी दडलेला आहे. त्या ओळी अशा-
          देवी फोडती अंगठी हाती हिऱ्याचा प्रहार
          वेग तोलून चिरती त्याच्या दंडांतील शीर...
          तसे पायातले रक्त झाले पाचोळ्यात गोळा
          जशी आणखी गोठली एक कैवल्याची शिळा...
          खरे तर पालखी वाहणाऱ्याच्या पायात काटा रुतल्याने पाय आणि पाचोळा रक्ताने लाल झालेला आहे. पण अनुभवाला नेणिवेच्या पातळीवरच साकारणाऱ्या कवी ग्रेसांना या निमित्ताने आणखी एका विधीचे सूचन करावयाचे आहे. डॉ. वाकोडे यांच्या मते, ही शीर दंडातील म्हणजे बाहुतील नाही, नाहीतर पायात रक्त कसे गोळा झाले असते? ती शीर ध्वजदंडातील आहे. हा पुरुषत्वाच्या खच्चीकरण सोहळ्याचा पूर्वार्ध आहे. “देवीच्या विधीविधानातील ही खच्चीकरण प्रथा आहे. गारगोटी किंवा तत्सम खडे हे या कामी वापरण्याची रीत, कारण त्यांची धार निर्जंतुक असते...पुरुषाच्या पायाला झालेल्या जखमा त्यांना मरणदीप्तीचे प्रारंभ वाटतात. पालखीचे गीत वाकवून घेणे त्यांना शक्तिपाताच्या मधात थांबलेल्या लवचिकपणाचा कौल वाटतो.” (मधुकर वाकोडे: २०१५: २०८-२०९)
          पुरुषाच्या ध्वजदंडातील शीर तोडल्यामुळे पायातील रक्त पायाखालच्या पाचोळ्यात गोळा होते, तेव्हा कवीला पायाचा स्पर्श करून उद्धार झालेल्या अहल्येची आठवण होते. रामाच्या पदस्पर्शाने जशी अहल्या पावन झाली तसा पुरुष या रक्ताने पावन होतो, असे कवीने सूचित केले आहे. आता कवितेचा नुसता अर्थ कळत नाही तर देवीच्या विविध विधींचा क्रमही ध्यानात येतो. म्हणजे दिव्य संभव, पालखी, नखक्षते, खच्चीकरण, आसूडप्रहार, मीलन, सृजन, मातृत्व आणि संहार असा हा क्रम आहे.
          पुढील ओळीत पुन्हा दृश्य आहे -
          तळहाताचा दिलासा असा सोडला दिव्यांत
          आता वाटले देवींना मोती भरावे भांगात...
          आले मेंदूच्या घळींत मेल्या नदिचे स्मरण
          रत्नमंडळाचे डोह तिच्या पात्रात भयाण
          देवीच्या निमित्ताने नदीच्या पाण्यात पेटते दिवे सोडण्याची प्रथा आहे. असे अनेक दिवे पाण्यात सोडलेले असून, प्रत्येक भक्ताने आपल्या तळहाताचा दिलासाच जणू दिव्याच्या रूपाने सोडला आहे, असे कवीला वाटत आहे. या दिव्यांची रांग मोत्याप्रमाणे भासते, ते दिवारूपी मोती भांगात भरावे, म्हणजे शृंगार करावा, असे देवीना वाटते, अशी कवीची भावना आहे. पण ग्रेसांच्या कवितेत निर्मितीच्या वेळीच विनाशाचीही भावना तीव्र होत असते. त्यामुळे याच वेळी कवीला पाणी आटलेल्या एका मेल्या नदीचे स्मरण होते, जिच्या पात्रात अशा अनेक सुकलेले दिव्यारूपी द्रोण भयाण वाटत आहे, असे स्मरण होते. दृश्य आणि मनाचा संज्ञाप्रवाह असे या कवितेत आलटून पालटून सामोरे येत जाते. त्यामुळे आपल्यावर देवी कृपा होणार की नाही, अशी शंका कवीला वाटते.
          शेवटी ही पालखी आपल्या गंतव्य स्थानी पोचते.
          थोड्या वेळाने पालखी भुईस्पर्शाला वाकेल
          चार भोयांचा चेहरा मुकें आकाश झांकेल..
          देवी उतरल्या खाली माझ्या अंगोअंगी बळ
          आता सोसेल कां मला त्यांच्या मिठीतली झळ?
          पालखी आता भुईवर ठेवली जाणार, तिच्यातील देवी आता खाली उतरवल्या जाणार, याचे  कवीला एकीकडे समाधान आहे, तर दुसरीकडे शंकाही आहे. त्यामुळे मिठीतली झळ सोसणार नाही अशी न्यूनगंडाची भावना तीव्र झाली आहे. ग्रेसांच्या स्त्रीजाणिवेत अशा भावना एकत्रच असतात. प्रेमभावनेच्या, तळाशी पापभावना, कामभावनेच्या मुळाशी कामगंड आणि आकर्षणाच्या मुळाशीच तिरस्कार. ग्रेसांच्या सर्वच स्त्रीजाणिवेमागे या भावना आपल्याला दिसतात; मग ते स्त्रीरूप प्रेयसीचे असो, आईचे की देवीचे. आलासे यांनी वर सांगितल्याप्रमाणे, कवी ग्रेस स्वत:ला शाक्त पंथीय मानत. शाक्तपंथ काम आणि मीलनात मोक्ष मानतात. स्त्री देह हा देवाच्या समीप जाण्याचे साधन मानतात. त्यामुळे स्त्री विषयक गंड कवीच्या देवीविषयक कवितेतही येतो.
          आता देवी गंतव्य स्थानी पोचल्याने पालखी सुनी झाली आहे. फक्त त्या प्रतीकात्मक दोन मांजरी तेवढ्या आहेत. देवीच्या कृपेशिवाय हे जीव कसे जगातील अशीही शंका त्यांच्या मनात येते. कैसे सांभाळावे त्यांनी उष्ण पोटातले जीव?’ ही भीती तीच.  
          पाराअपाराच्यामध्ये उभें किनाऱ्यात धुकें
          चिंध्या पांघरुन राजा शोधे आपुले परके...
          काही तोडलेली बोटें काही मोडलेल्या नावा
          उभ्या उभ्याच लागला त्यांचा देवींना सुगावा...
          आणि दर्वळले पाणी थेट ओलांडुनी घाट
          देवीची कृपा आपल्यावर होणार की नाही? याची शंका आहे. कारण सगळ्याच नावा पलीकडे गेलेल्या नाहीत, मध्येच मोडलेल्या आहेत. काही बळी पूर्ण स्वीकारलेले नाहीत, फक्त बोटेच तोडलेली आहेत. आपल्यावरही अशी अर्धीच कृपा होणार तर नाही ना? ही ती शंका आहे. (तसेही देवीच्या समोर बोटे तुटलेले बळी असतात आणि नदीच्या पात्रात सुकेलेले दिवे, मोडलेल्या नावाही आहेत. अर्थात हे लौकिक आणि वाच्यार्थ रूप होय.) ‘पाराअपाराच्यामध्ये उभें किनाऱ्यात धुकें’ ते हेच. ही संदिग्धता केवळ लौकिक नाही. तिचा अलौकिकाशीही झगडा आहे. त्या पार आणि अपार यांच्या द्वंद्वात आता कवी- पोतराज- पुरुष अडकला आहे. म्हणजे कवी आणि प्रकृतीशी एकरूप होऊ पाहणारा पुरुष भिन्न राहत नाही. त्यामुळेच त्याला या सृजनरूपी मातृका देवीची कृपा होईल की नाही याची संदिग्धता आहे. मात्र पुढच्याच क्षणी या संदिग्धतेच सुगावा खुद्द देवीलाच लागतो आणि ‘भव्य शैलीने चुंबिले त्याने देवींचे ललाट’ असे पुरुष-प्रकृतीचे मीलन होते. त्यासाठी, नदीचे पाणी घाट ओलांडून भव्य लाटेने देवीच्या जवळ येते, अशी प्रतिमा वापरली आहे. म्हणजे संदिग्धता दूर होऊन कृपा लाभली आहे.
          अशाप्रकारे ग्रेस देवीच्या पालखीचा हा लौकिक अनुभव आध्यात्मिक साक्षात्काराच्या अलौकिक पातळीवर नेतात. एका स्थळकाळ विशिष्ट अनुभव स्थळकाळनिरपेक्ष करतात. वस्तुनिष्ठ अनुभव स्व:निष्ठ करतात. कविता संपते. शेवटी शंका मिटते आणि कवीला मीलनाचा म्हणजे दैवी कृपेचा साक्षात्कार होतो. अशा प्रकारे देवी दर्शन, पालखीसोहळा, विधिविधान ते साक्षात्कार असा या काव्यानुभवाचा परीघ आहे.
          ही ‘देवी’ कविता मर्ढेकरांच्या ‘ह्या गंगेमधि गगन वितळले’ या कवितेची आठवण करून देते. मात्र तिथे मर्ढेकरांना आध्यात्मिक साक्षात्काराची शंका आहे. तिथे अपूर्णता आहे आणि शेवटी मर्ढेकर सौंदर्यसाक्षात्कारावरच ‘हा मज इथला पुरे फवारा’ म्हणून समाधान मानून घेतात. अशीच कविता विंदा करंदीकरांचीही आहे. तिचे शीर्षक आहे, ‘मी पृथ्वीचा झालो प्रियकर’.  
          मी मातीशी करून मस्ती
          अधर-क्षत केले अवनीवर
          चढली माझ्या नवस्पर्शाने
          पृथ्वीच्या गालावर लाली
          इथे पृथ्वी ‘प्रकृती’ असून कवीच ‘पुरुष’ आहे. इथेही पुरुष- प्रकृती मीलन आहे, मात्र कवी विंदा मार्क्सवादी असल्याने हे मीलन लौकिक आहे. सृष्टीची निर्मिती अलौकिक नसून लौकिक आहे आणि ती मानवकेंदी आहे, देवताकेंद्री नाही, असे कवीने सांगितले आहे. तेथे दैवी मायेच्या ठिकाणी पृथ्वी आहे, तर पुरुषाच्या ठिकाणी मानव प्रतिनिधी कवी आहे. म्हणजे पुरुष-प्रकृती या संकेताला विंदानी पूर्ण लौकिक केले आहे. “आपल्या संस्कृतीत पुरुष-प्रकृती मैथुनातून सृष्टीनिर्मिती होते असे मानले जाते. कवीने या सांस्कृतिक धारणेलाच छेद दिला आहे.” (देवानंद सोनटक्के: २०१२: ८९)
          कवितेसाठी लौकिक अनुभवाचे द्रव्य घेऊन तरल सर्जनशील काव्य या तीन प्रतिभावंतांनी निर्माण केले आहे. मात्र तिघेही वेगवेगळ्या तऱ्हेने अनुभवाला सामोरे जात आहेत. म्हणजे मर्ढेकर सौंदर्य साक्षात्कारात समाधान मानतात, विंदा मानवी निर्मितीला महत्त्व देतात, तर ग्रेस देवी कृपेला. म्हणजे पहिली जाणीव सौंदर्यानुभवाची, दुसरी लौकिक - पार्थिव तर ग्रेस यांची पूर्ण अलौकिक, अपार्थिव, आध्यात्मिक आहे. इथे साक्षात्काराचे समाधान आहे.
          असाप्रकारे कवितेचे गूढ वलय आता पूर्ण विलगित झाले आहे. आपल्यासाठीही अनुभव समीप व साक्षात झाला आहे. संहितेशी आपण पूर्ण समरस व एकरूप झालो आहे. असा योग जुळून येणे हा प्रातिभ आस्वादाचा भाग असतो, मित्रांनो.
          आणखी एक, ग्रेस स्वतःला ज्या पंथाचे मानतात, त्या शाक्तपंथाचे तत्वज्ञान नीट समजून घेतले तर यातील उरली सुरली गूढताही संपून जाईल. अर्थात, ते काम अभ्यासकाचे आहे, समीक्षकाचे नाही.        
  
संदर्भ सूची :
१. मधुकर वाकोडे : देवी, ग्रेस : वेदना आणि सौंदर्य, संपा. अजय देशपांडे, २०१५
२. वीणा आलासे : मायानगरीचा पाहुणा, ग्रेस नावाचं गारुड, संपा. प्रवीण बर्दापूरकर, विजय प्रकाशन, २०१३
३. स. आ. जोगळेकर: प्रस्तावना, गाथासप्तशती, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१२
४. मनोज तायडे : आई, ग्रेस : वेदना आणि सौंदर्य, संपा. अजय देशपांडे, विजय प्रकाशन, नागपूर, २०१५
५. देवानंद सोनटक्के: विंदा करंदीकर: पृथ्वीचा प्रियकर, समीक्षेचा अंत:स्वर, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१२
६. पंडित महादेवशास्त्री जोशी : संस्कृतिकोश, खंड, नववा
------------------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी 
१. सर्वधारा, अमरावती, जुलै-ऑग-सप्टें, २०१५
२. ग्रेस : वेदना आणि सौंदर्य, अजय देशपांडे (संपा.), विजय प्रकाशन, नागपूर , २०१५
३. कवितेचा अंत:स्वर , डॉ. देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१८ 

3 comments:

कवी ग्रेस : इराणी संगीताच्या प्रतिमा

आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी संगीताच्या प्रतिमा... मला आलिंगनात मरण तसा रात्रीचा शृंगार, तुझे चांदरातींचें अर्...